सामान्य जनमाणसांचे प्रतिनिधित्व करणारे प्रामाणिक संचालक विश्वस्ताप्रमाणे निरपेक्ष वृत्तीने कार्य करीत असल्याने एकदा अपवाद वगळल्यास या बँकेची निवडणूक नेहमी बिनविरोध झाली आहे. हे या बँकेचे आणखी एक वैशिष्ट म्हणता येईल. बँकांच्या कारभारात पारदर्शकता आणणेसाठी सन १९९३ मध्ये नरसिंहिय्या कमिटीच्या शिफारसी रिजर्व्ह बँकांना लागू केलेल्या आहेत. एन. पी. ए. शिफारसींच्या अंमलबजावणीमुळे बँकेच्या कारभाराचे वास्तव दर्शन सभासदांना होणार आहे. एन. पी. ए. अंमलबजावणीमुळे अनेक बँकावर परिणाम होऊन त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असताना आमच्या बँकेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. याचे कारण म्हणजे आपल्या बँकेने सुरुवातीपासूनच आपला कारभार स्वच्छ, कार्यक्षम व काटकसरीने करून मोठ्या प्रमाणात निधी उभा केला आहे. त्यामुळे एन. पी. ए. शिफारसींचा बँकेवर कोणताही अनिष्ठ परिणाम झालेला नाही. यासाठी बँकेच्या व्यवस्थापनाने योग्य ती कार्यपद्धती आणली असून बँकेने नियमित, अनियमित थककर्जाचे बाबतीत संशयित बुडीत कर्जाची योग्य पद्धतीने तरतुदी केलेल्या आहेत. बँक सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिलेली आहे. कुरुंदवाड व परिसराच्या सामाजिक जडणघडीत विकासात बँकेचा सिहांचा वाटा आहे. बँकेने आतापर्यंत आयुर्वेदिक आरोग्य शिबीर, लोकन्यायालय, बँकेचे कार्यक्षेत्रातील शेतकरी व सभासद यांना मार्गदर्शनपर रेशीम व ऊस उत्पादनाबाबतची शिबिरे आयोजित केली आहेत.